सोलापूर - येथील शासकीय रुग्णालयात 120 खाटांचे कोव्हिड वॉर्ड अवघ्या दहा दिवसांत तयार करण्यात आले. रविवारी (दि. 26 जुलै) या कोविड वार्डाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार यशवंत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बी ब्लॉक येथे 120 खाटांचे नवे कोव्हिड वॉर्ड तयार करण्यात आले आहे. या वॉर्डामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. टाळेबंदीच्या दहा दिवसांत हे वॉर्ड तयार झाले आहे. रात्रंदिवस काम करुन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, खाट, गाद्या, बेडशीट आदींची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शानाखाली हे कोव्हिड वॉर्ड तयार करण्यात आले आहे.
यावेळी, आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, अवघ्या दहा दिवसांत हे कोव्हिड वॉर्ड तयार झाले आहे. देवाकडे प्रार्थना हीच आहे की, ही महामारी नष्ट होऊन हे वॉर्ड रिकामे दिसावे, असेही त्या म्हणाल्या. सध्याच्या कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्या पाहता लवकरच अधिकचे 20 आयसीयू बेडची (अति दक्षता विभागातील विशेष खाट) सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
या उद्घाटनावेळी पालकमंत्री दत्ता भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष पवार आदी अधिकारी व कर्मचारी, परिचारिका, डॉक्टरांंची प्रमुख उपस्थिती होती.