सोलापूर - कोरोनाच्या फैलावानंतर संपूर्ण जग आज भयभीत झाले आहे. अशा परिस्थितीत मानव हितासाठी महात्मा गांधींनी घालून दिलेला 'गावाकडे चला' हा मूलमंत्र आज पुन्हा एकदा नव्याने जगाला पटला आहे. म्हणून मानव जातीच्या हितासाठी आता तरी महानगरांकडून पंचक्रोशीतल्या शाश्वत हरित शिवारवस्त्यांकडे चला, असे आवाहन रुरबन संकल्पनेचे प्रणेते आणि शास्त्रज्ञ अरुण देशपांडे यांनी केले आहे.
देशपांडे यांनी मोहोळच्या अंकोली येथे गेल्या 35 वर्षांपासून गांधीजींच्या विचारधारेवर आधारित शहरी अधिक ग्रामीण जीवन पद्धतीची सांगड घालणारा रुरबन पायलट प्रोजेक्ट साकारला आहे. आता कोरोना पूर्वीचे जग आणि कोरोनानंतरचे जग या पार्श्वभूमीवर त्यांनी etv भारतशी बोलताना आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. औद्योगिक विकासाच्या नावाखाली शहरांमध्ये वाढलेली गर्दी ही आता समृद्ध जीवन जगण्यासाठी सपशेल फोल ठरली, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या प्रभावानंतर लोकांचे जथ्ये गावांकडे धडकले पण त्यांचे स्वागत झाले नाही. उलट शहरी स्थलांतरितांना गावबंदी करण्यात आली. माणसे एकमेकांपासून दूर पळू लागली. अशा आभासी विकासावर बोलताना अरुण देशपांडे यांनी लोकल ते ग्लोबल मॉडेलने मानवी प्रवास यावर वास्तववादी भाष्य केले.
इतकेच नाही तर कोरोनाच्या कहरानंतर निर्माण झालेला जागतिक गोंधळ दूर करण्यासाठी रुरबन एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी देशपांडे यांनी रुरबन प्रोझ्युमर ग्लोकल वसाहती निर्माण करुन शहरी गावकऱ्यांच्या सन्माननीय घरवापसीसाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत.