सोलापूर : महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी सोमवारी रात्री शहरासाठी नवीन कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर केली. या नियमावलीनुसार शहरात सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी असेल. तर शनिवार रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असेल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी सोलापुरात केली जाणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
काय सुरू राहणार
- हॉस्पिटल, वैद्यकीय विमासंबंधी कार्यालय, फार्मसी कंपन्या व इतर आरोग्य सेवांना मुभा देण्यात आली आहे
- किराणा, भाजीपाला, बेकरी, दूध डेअरी, खाद्यपदार्थची दुकाने निर्धारित वेळेत सुरू राहतील
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वे, बस, टॅक्सी, ऑटो रिक्षा सुरू राहतील. पण प्रवाशांची संख्या मर्यादित राहणार आहे
- कृषी सेवेशी निगडित मालवाहतूक सुरू राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार सुरू राहतील. ई-कॉमर्स व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना सूट देण्यात आली आहे
- ऑटो रिक्षात चालक व दोन प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे
- मार्केट व आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील
- वाहन चालकांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे
- विद्युत सेवा, टेलिफोन सेवा, वैद्यकीय वस्तू वितरण करणाऱ्यांना सवलत
- खासगी वाहतूक करणाऱ्या बसेसना सोमवार ते शुक्रवार अशी परवानगी असणार आहे. मात्र टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. अन्यथा दंड आकारला जाईल
काय बंद राहणार
- सिनेमा हॉल, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क, वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहणार आहे. मोठ्या प्रमाणावर कलाकार एकत्रित येऊन चित्रीकरण करण्यास मनाई आहे
- प्रवाशांसाठी असलेले हॉटेल वगळता इतर सर्व हॉटेल, बार रेस्टॉरंट बंद राहतील
- हॉटेल चालकांना होम डिलिव्हरी, पार्सल सेवा सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत करता येईल. मात्र होम डिलिव्हरी करणाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरपोच सुविधा देणाऱ्यांना 10 एप्रिलनंतर प्रत्येकी 1 हजार रुपये दंड आणि किंवा संबंधित आस्थापनेस 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे
- वृत्तपत्र विक्री सकाळी सात ते आठ या वेळेत होईल. वृत्तपत्र वितरित करणाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे
- शाळा, महाविद्यालये बंद राहतील. फक्त दहावी बारावीच्या परीक्षांना सवलत देण्यात आली आहे
- खासगी क्लासेस बंद राहतील
- जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रमांना जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक. बंदिस्त कार्यक्रमांना 50 पेक्षा व्यक्तींना परवानगी नाहीच
- धार्मिक विधीची पूजा स्थळे बंद राहणार आहे. फक्त पुजाऱ्यांना व मशिदीमधील मौलवींना परवानगी दिली आहे. मात्र बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे
- अंत्यविधीसाठी फक्त 20 जणांना परवानगी. पण अंत्यविधीत समाविष्ट असणाऱ्या नागरिकांना कोविड चाचणी बंधनकारक
- रस्त्यालगत खाद्यविक्रीस बंदी
- उद्योग-धंद्यामधील कामगार पॉजीटीव्ह आढळल्यास त्यास पगारी रजा द्यावी. कामावरून काढू नये