माढा (सोलापूर): माढा शहरासह सोलापूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये मार्च महिन्यातील शासकीय सुट्ट्यांदिवशी देखील सुरु राहणार आहेत. याबाबतचे लेखी आदेश जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. याचे पत्र माढ्यासह जिल्ह्यातील इतर कार्यालयांनाही प्राप्त झाले आहे. त्यानुसार, मार्च महिन्यात २१, २७ आणि २८ मार्च या सुट्टीच्या दिवशीही माढ्यातील शासकीय कार्यालय सुरू राहणार आहे.
या दिवशीही कार्यालय सुरू :
२७ मार्च या शासकीय सुट्टीदिवशी सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट येथील कार्यालय सुरू राहणार आहे. तसेच, २७ आणि २८ मार्च रोजी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर मधील दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार आहे.
नागरिकांची गैरसोय दूर होणार :
माढ्याच्या कार्यालयात मागील काही दिवसांपासून बी.एस.एन.एल कनेक्टिव्हिटी वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडत आले आहेत. यामुळे माढ्यासह तालुक्यातील नागरीकांचे दस्त प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शासकीय सुट्टीदिवशी कार्यालय सुरु राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय दुर होणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्कची सवलत ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे संभाव्य होणारी गर्दी आणि पक्षकारांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यालय चालू ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा - माणुसकी अजून शिल्लक आहे! पंचशील बचत गट करतोय कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार
कोट-माढा कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासह अन्य कार्यालयीन कामकाजासाठी बि.एस.एन.एल.च्या इंटरनेट संबंधी सुविधांचा अडथळा सातत्याने होत आहे. त्यामुळे अनेक दस्त प्रलंबित राहिले आहेत. शासकीय सुट्ट्यांदिवशी देखील कार्यालय सुरु राहणार असल्याने पक्षकारांची सोय होणार आहे. - अशोकराव चव्हाण, दुय्यम निबंधक माढा.