पंढरपूर -सोलापूर जिल्ह्यात अचानक वातावरणामध्ये बदल झाल्याने मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने सायंकाळी सहा वाजता हजेरी लावली. उकाड्यामुळे काही दिवसापासून हैराण असलेल्या नागरिकांना थंडगार हवेचा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस या तालुक्यामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची नोंद झाली. गेल्या पंधरा दिवसामध्ये या तालुक्यात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाचा पंढरपूरसह अन्य तालुक्यांच्या बागायत शेती पिकांना फटका बसला आहे.
द्राक्ष बागायत शेतीचे नुकसान..
सोलापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे द्राक्ष, पपई, डाळिंब, कलिंगड या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामुळे पंढरपूर, मंगळवेढा तसेच सांगोला तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसातून दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात अवकाळी पावसाने हे नुकसान झाले आहे.
उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा..
सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्यातील नागरिक उकाड्यामुळे भलतेच हैराण झाल्याचे दिसून आले. मात्र, सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून सुटका झाली. गेल्या दोन दिवसापासून प्रचंड तापमान जिल्ह्यात जाणवत आहे. त्यानंतर सोमवारी वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट होत हजेरी लावली.
हेही वाचा - मराठवाड्यात चार दिवस विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता
हेही वाचा - सोलापुरात काल 1537 नव्या कोरोना रुग्णांची भर; 1327 रुग्ण बरे