सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक लहान मुले पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, बाधित झालेल्या या मुलांमध्ये कोरोना आजाराची फारसे लक्षणे नाहीत.
आजतागायत 12 हजार मुलांना लागण -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासूनच मुलांमध्ये करोना संसर्ग होण्याचे प्रमाण प्रकर्षांने दिसू लागले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील सुमारे १२ हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र यामध्ये अलिकडच्या काही दिवसांत वाढ होत असल्याचेही दिसून येत आहे. यात अगदी गेल्या दहा दिवसांत तब्बल ६१३ मुले करोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये विशेषत: बाधितांचे प्रमाण मोठे आहे. मात्र लहान मुलांच्या या वयोगटातील लसीकरण झालेले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढलेले दिसत असले, तरी या मुलांमध्ये करोनाची फारशी लक्षणे दिसत नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लहान मुलांना लागण -
शहर व जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या सव्वा वर्षांत आढळून आलेल्या बाधित मुलांमध्ये सर्वाधिक ११ हजार ८८६ मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत. यात ६७७३ मुले तर ५११३ मुलींचा समावेश आहे. या दहा दिवसांत बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असण्याची भीती सुरुवातीपासून व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
दहा लाख मुलांची तपासणी -
जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील सुमारे 9 लाख 77 हजार मुलामुलींची आरोग्य तपासणी सुरू असून 8 लाख 34 हजार बालकांची तपासणी पूर्ण झाली आहे. 70 पेक्षा अधिक मुले कोरोनाबाधित दिसून आली आहेत. 40 हजार बालकांना विविध आजार असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. 560 बालके अशी आहेत ज्यांना कोरोना सदृश्य रोगाची लागण झाली आहे. त्या सर्व बालकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील लहान बालकांच्या तपासणी सुरू आहेत. धार्मिक क्षेत्र असलेले पंढरपूर येथे नागरिकांचे ये जा असते त्यामुळे पंढरपूर, सांगोला या भागातील जास्त कोरोना रूग्ण दररोज 200 ते 250 मिळून येत आहेत. याच भागातील संसर्गित मुलं जास्त आढळून आल्याने जिल्हा आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे.