पंढरपूर - दोन वाहनांतून बेकायदेशीररीत्या तंबाखूची वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता सरगम चौक येथे ही कारवाई करण्यात आली. सुमारे दहा लाख रुपये किमतीची दोन वाहने आणि त्यातील 25 लाख 17 हजार 600 रुपयांचा तंबाखू, असा एकूण 35 लाख 17 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सागर दत्तात्रय महाजन, नागझरवाडी, जि. उस्मानाबाद व रवींद्र रामचंद्र दिवार, आळंद मातोबा, जि. पुणे हे तंबाखूजन्न पदार्थांची वाहतूक करीत असल्याचे आढळले. पंढरपूर शहर पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना पत्राव्दारे कळविल्यानंतर त्यांनी कारवाई केली आणि पंचनामा करून हा साठा सील करून ताब्यात घेतला.
वाहनचालक सागर दत्तात्रय महाजन, रवींद्र रामचंद्र दिवार, योगेश काळभोर, विष्णू प्रजापत, निलेश काळभोर यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षापात्र कलम 59 व भादंवि कलम 188, 272, 273, 328, 34 प्रमाणे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.