सोलापूर - स्थानिक गुन्हे शाखेने उत्तर-सोलापूर तालुक्यातील नांदूर येथील अवैध वाळू उपशा पॉईंटवर कारवाई केली आहे. यामध्ये 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच 17 संशयित आरोपींविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी हे यारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी घेता आणि कोणत्याही प्रकारची राॅयल्टी न भरता चोरून वाळू उपसा करत होते. तसेच त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या या माहितीवरून ही कारवाई केली आहे.
मोका अंतर्गत असलेल्या आरोपींकडून वाळू उपशाची माहिती प्राप्त -
मागील काही दिवसापूर्वी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियातील मोका अंतर्गत फरार असलेल्या दोन जणांना जेरबंद करण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली होती. हे दोन्ही मोहोळ तालुक्यातील मिरी येथील आहेत. यानंतर 15 फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांच्याकडून बातमी मिळाली की, मौजे नंदूर (ता. उत्तर सोलापूर ) शिवारातील नंदूरकर यांचे शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून काहीजण यारी मशिनच्या सहायाने शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करत आहेत. तसेच त्याची विक्री करीत आहेत.
हेही वाचा - दिशा रवी अटक प्रकरण : गोवा महिला काँग्रेसकडून घटनेचा निषेध
कारवाईत 16 लाखांचा मुद्देमाल जप्त -
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी विषेश पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांना तत्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. यानंतर मुजावर यांनी पथकासह नंदूर (ता. उत्तर सोलापूर) शिवारातील नंदूरकर यांचे शेताजवळ छापा टाकला. यावेळी तेथे काहीजण शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरला यारी मशीन जोडून त्याव्दारे वाळू काढून टेम्पो ट्रकमध्ये वाळू भरत असताना आढळले. यावेळी एकूण 17 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 10 ब्रास वाळू, 1 यारी मशीन, 1 ट्रॅक्टर, 3 टेम्पो ट्रक, 1 टाटासुमो, 2 मोटार सायकली, असा एकूण 16 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले यांनी फिर्याद दिल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे -
- संतोश गुरलीगप्पा बिराजदार (वय–40 वर्ष, रा-सोरेगाव, ता. दक्षिण सोलापूर)
- सौरभ मलकाहारी डुरके (वय-20 वर्ष, रा.सोरेगाव, ता. दक्षिण सोलापूर)
- सिध्दाराम नागय्या स्वामी (वय-32 वर्ष, रा. सोरेगाव, ता. दक्षिण सोलापूर)
- विषाल बलभिम वाघमारे (वय-28 वर्ष)
- आकाश अशोक गजाकोश (वय-20 वर्ष, रा.सोरेगाव ता. दक्षिण सोलापूर)
- अमर उर्फ धर्मराज नंदकुमार डुरके (वय-34 वर्ष, रा. सोरेगाव ता. दक्षिण सोलापूर)
- राज संतोश जाडंकर( वय-20, रा. सोरेगाव, सोलापूर)
- अक्षय शिवाजी कोळी (वय-25, रा. सोरेगाव)
- सिध्दाराम बनसिध्द खडाखडे (वय-20, रा. सोरेगाव ,सोलापूर)
- रवि बनसिध्द खुटेकर (वय-26, रा. सोरेगाव,सोलापूर)
- वैश्णव शंकर नंदुरकर (वय-28, रा. सेटलमेंट सोलापूर)
- लखन शिवाजी कांबळे( वय-31 रा. नंदुर,सोलापूर),
- यल्लय्या नागय्या स्वामी (वय-33, रा. सोरेगाव,सोलापूर)
- शिवा यलय्या केशपा (वय-29, रा. सात रस्ता,सोलापूर)
- शिवाजी सुधाकर शेंम्बडे( वय-25, रा. पैठण, जि.औरंगाबाद)
- नागेश विलास लांडे (वय-23, रा. पैठण, जि.औरंगाबाद)
- सचिन राजु कुचे (वय 25, रा.पैठण, जि.औरंगाबाद) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.