सोलापूर - माढा तालुक्यातील खैरवाडी येथील मनीषा भांगे व गोरक भांगे या माय-लेकरांनी शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तीन गुंठे जमिनीतून त्यांनी हजारो रुपयांचे विविध बारमाही पीक घेतले आहे. याचा एकरी हिशोब केला असता 6 लाख रुपये उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तीन गुंठे पडीक जमिनीतून त्यांनी सेंद्रिय शेती करत विविध फळे, भाज्या पिकवल्या आहेत.
विविध पिकांनी फुलवलेल्या या सेंद्रिय शेतीला पाहण्यासाठी विविध शेतकरी भेट देत आहेत. भांगे कुटुंबीय त्यांना मोफत मार्गदर्शन करत मोफत बी-बियाणे वाटप करत आहे.
तीन गुंठे शेतीबरोबर बांधाचा उपयोग-
गोरक्षनाथ भांगे यांनी तीन गुंठे शेती सोबत शेतातील बांधाचा योग्य उपयोग कसा केला, याबाबत माहिती दिली. मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाला भांगे कुटुंबीयांनी बांधा वर 400हुन अधिक सागाची झाडे लावली आहेत. मुलगा 20 किंवा 25 वर्षाचा होईपर्यंत ही झाडे देखील मोठी होतात. या झाडांची किंमत देखील पुढे भविष्यात 25 ते 30 लाख रुपयांपर्यंत जाईल. तसेच सागाच्या झाडांच्या मध्यभागी आधुनिक कल्पवृक्ष म्हणजेच शेवगा ही झाडे लावली आहेत. शेवगा फळ हे मानवी आरोग्यावर औषधी वनस्पती आहे. म्हणजेच सागाच्या झाडासोबत उत्पन्न देखील सुरू केले आहे.
काय आहे तीन गुंठे सेंद्रिय शेती मॉडेल-
तीन गुंठे क्षेत्रात भांगे कुटुंबियांनी 75 प्रकारची विविध पाले भाज्या, फळ, औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. यामध्ये मेथी, वांगे, बटाटे, कांदे, मिरच्या, भेंडी, पालक, कोथिंबिर, शेवगा, पेरू, आंबे, चिकू अशा विवीध प्रकारची फळ आणि पाले भाज्याची लागवड केली आहे. यामधून निरोगी व विषमुक्त पाले भाज्या पिकवले जातात. आज बाजारात विविध प्रकारचे फळं आणि पालेभाज्या कृत्रिमरीत्या पिकवून विक्री केल्या जातात. या तीन गुंठे सेंद्रिय शेतीतुन नैसर्गिकरित्या पिकवलेल पीक उत्पादन केले जाते.
पतीच्या निधनानंतर मनीषा भांगे यांनी शाश्वत आणि सेंद्रिय शेतीचा विकास केला-
पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मनीषा भांगे यांवर पडली होती. पुरुषी मक्तेदारी असलेल्या शेती व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून देत तीन गुंठ्यांत सेंद्रिय शेती विकसित केली. जिद्दीच्या जोरात त्या कुटुंबाने सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला. संपूर्ण माढा तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र भर खैरवाडीच्या आदर्श शेतीचा प्रयोग पाहण्यासारखा आहे.
हेही वाचा- शेतकरी आंदोलनाचे ऑस्ट्रेलियात परीनाम; लग्नात पोस्टर्स लावून दिला पाठिंबा, पाहा व्हिडीओ