पंढरपूर (सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यातील शेकडो गावे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यातील 623 गावे जलमय झाली असून 8608 कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 15 ऑक्टोबराला एकाच दिवशी सरासरी 93.60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा व माळशिरस या तालुक्यात एकाच दिवशी 100 मिलि मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 58 हजार 581 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.
या पावसामध्ये सोयाबीन, कापूस, भाजीपाला, डाळिंब, कांदा, तूर, भुईमूग, बाजरी, ज्वारी, द्राक्ष, मका, उडीद, चारापिके, सूर्यफूल, पपई, केळी, कलिंगड या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 8 हजार 608 कुटुंबातील 32 हजार 521 जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील तब्बल 570 गावे बाधित झाली आहेत. यामुळे 4895 घरात पाणी शिरल्याने हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. अतिवृष्टीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून 478 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. तर 1715 पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. पुरात नऊ नागरिक वाहून गेले असून चार जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर अद्याप पाच लोक बेपत्ता आहेत. 214 ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून रेस्क्यू आपरेशन मागील साठ तासांपासून सुरू होते. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यामुळे साडेसहाशेहून अधिक गावांमध्ये पूरस्थिती होती. त्यामुळे अनेक कुटुंबीयांना स्थलांतरित व्हावे लागले, तर 829 जनावरे दगावली असून 2256 घरांची जबरदस्त पडझड झाली आहे. पुरामुळे 7832 पक्षी दगावले आहेत.