पंढरपूर - कोरोना, लॉकडाऊन आणि उन्हाळ्याचा उकाडा या सर्व गोष्टी एकाच वेळी उभ्या ठाकल्या आहेत. राज्याच्या कोकण विभागामध्ये अचानक आलेल्या वादळामुळे सोलापूर जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल झाला आहे. सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजेच्या लखलखाटात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळामुळे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माढा तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्हावासीयांना मात्र उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला
सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे. मात्र जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पेरणीचे दिवस सुरू आहेत.त्यामुळे शेतकऱ्याही शेती कामाची लगबग सुरू आहे. आज मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
हेही वाचा - ठाणे; डायघर भागात पेटीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह