सोलापूर - येथील दक्षिण सोलापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले तसेच 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयात शंभर टक्के उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्यानंतर आता दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालक्यातील पंचायत समिती अंतर्गत 50 वय वर्षे पूर्ण झालेल्या पण कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अभियंता, शिक्षण विस्तार, पशुधन पर्यवेक्षक, कृषी, परिचर, वाहन चालक यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे तहसील दक्षिण सोलापूरकडील कर्मचारी असे एकूण 96 कर्मचाऱ्यांची पहिल्या टप्प्यातील तपासणी करण्यात आली.
प्रांताधिकरी ज्योती पाटील, गट विकास अधिकारी राहुल देसाई, तहसीलदार अमोल कुंभार, अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली केटरींग कॉलेज विजापूर रोड येथील प्रांगणात ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दिगंबर गायकवाड यांच्या सनियंत्रणात डॉ. प्रवीण खारे, डॉ. इरणा राठोड या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य विस्तार अधिकारी बी.के. चव्हाण, काशिनाथ बिराजदार, आर.यु. राठोड, भारत जाधव, संगीता नवळे यांच्या पथकाने कर्मचाऱ्यांची तपासणी केली.
या तपासणीत कर्मचाऱ्यांचे रक्तदाब, मधुमेह, संपूर्ण रक्त चाचणी, किडनी, रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण, शरीर तापमान,व आवश्कतेनुसार इतर तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांना रोग प्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले. तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी विवेक लिंगराज, नायब तहसीलदार, जाधव, पी.जे. राऊत, सचिन मायनाळ, सुशील गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. गट विकास अधिकारी पंचायत समिती उत्तर सोलापूर समाधान नागणे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वाय.पी. कांबळे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.