सोलापूर - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मंगळवेढा तालुक्यातील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आयोगाने संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला. या परीक्षेत तांडोर येथील हर्षलने देशात प्रथम क्रमांक पटकावल्याचे समोर आले.
लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण उमेदवारांचा सप्टेंबर- आक्टोबर महिन्यात मुलाखतींचा टप्पा पार पडला. या परीक्षेंतर्गत 511 जागा रिक्त होत्या. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या 161, यंत्र अभियांत्रिकीच्या 136, विद्युतच्या 108 व अणुविद्युत व दुरसंचार अभियांत्रिकी शाखेच्या 106 जागा रिक्त होत्या.
या यशानंतर हर्षलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तांडोर येथील त्याच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांसह नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली.
हर्षल पाच वर्षांचा असताना त्याचे वडील मृत पावले होते. यानंतर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. डिप्लोमा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तसेच डिग्री- गव्हर्नमेंट कॉलेज,कराड येथे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन त्याने राजीनामा दिला.
यानंतर त्याची पुण्यातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन येथे निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने (इंजिनिअर सर्व्हिसेस) पूर्वपरीक्षा जानेवारी महिन्यात व मुख्य परीक्षा जून महिन्यात दिली होती. यानंतर दि.25 ऑक्टोबरला निकाल लागल्यावर त्याने देशात पहिला येण्याचा मान मिळवल्याचे समोर आले.