सोलापूर - एक किंवा दोन्ही हात पाय गमावलेली एखादी खचून गेलेल्या व्यक्ती आपल्या आसपास कायमच बघायला मिळतात. मात्र, जे वाट्याला आले त्याचा स्वीकार करुन जो आधार मिळतोय त्याला सोबत घेत मोठ्या जिद्दीने आपल्या दिव्यांगात्वावर मात करणाऱ्या व्यक्तीही समाजात असतात. यापैकीच माढा तालुक्यातील मानेगाव येथली नयना नागनाथ जोकार ही 15 वर्षीय विद्यार्थीनी आहे. तीची उंची अवघी २ फुट असून ती शरीराने दिव्यांग आहे. ती संजीवनी विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकते. नागपुरच्या ज्योती अमगे नंतर सर्वात ठेंगणी म्हणून नयनाची दखल घेतली जाते. तिचे वजन केवळ ८ किलो आहे. मात्र, या सगळ्या परस्थितीनंतरही शिक्षणाचे धडे घेण्याची प्रचंड जिद्द तीच्या अंगी आहे.

घरची हालाखीची परिस्थिती आणि दिव्यांग असल्याने आईने नयनाला सुरूवातीला अनेक दिवस शाळेत जाऊ दिले नाही. मात्र, तिचा शाळेत जाण्यासाठी हट्ट सुरूच होता. अखेर तिच्या जिद्दीला शरण जात तिला उशीरा का होईना शाळेत घातले गेले. नयना उंचीने जरी ठेंगणी असली तरी ती बुध्दीने अतिशय तल्लख अन् हुशार आहे. ती गावातीलच संजिवनी विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे.
नयनाचे आईवडील तिला कडेवर उचलून नेत शाळेत पोहचवतात. त्यानंतर मात्र तिला कुणाच्याही मदतीची गरज भासत नाही. आपली सर्व कामे ती स्वत: करते. मधल्या सुट्टीत तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत खेळतात. तिला मदतही करतात. आम्हांला तिच्याकडे बघितले की खुप काही शिकायला तर मिळतेच अन् प्रेरणादेखील मिळते अशी प्रतिक्रिया तिची मैत्रिण अश्विनी घोरपडेने दिली.

नयना जिद्द चिकाटीने अभ्यास करते. मात्र, तिची परिस्थिती अतिशय हलाखिची आहे. नयनाला ने-आण करण्यासाठी आई सुनिता यांना कामावर जाता येत नाही. वडील नागनाथ हे बांधकाम मजुरी करतात. नागनाथ यांचा एकट्याचाच कुटुंबाला आर्थिक आधार आहे. असे असले तरी दिव्यांग असल्याचे कोणतेही रडगाणे न गाता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नयनाने आपल्या अंगी असलेले कसब समाजाच्या पुढे कृतीतून दाखवून दिले आहे. जागतिक दिव्यांगदिनाच्या निमित्ताने नयनाची यशोगाथा समाजातील इतर दिव्यांगांसाठी नक्कीच बळ देणारी ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.