सोलापूर - पोलिसांच्या त्रासाला कंटाळून अकलूजमध्ये एका दिव्यांग टपरी चालकाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आदम तांबोळी (४५) असे या व्यक्तीचे नाव आहे.
तांबोळी यांची जुन्या पोलीस ठाण्यासमोर पानटपरी आहे. त्यांनी आपल्या ओळखीच्या एका महिलेस अडचणीत असताना खासगी फायनान्समधून ३० हजार रूपयाचे कर्ज काढून दिले होते. त्यातील काही रक्कम त्या महिलेने हप्त्याने भरली मात्र, उर्वरित हप्ते न भरल्याने तांबोळी यांनी महिलेकडे पैसे मागितले. मात्र, तांबोळी यांनी पैशाचा तगादा लावल्याने हप्ते भरता येत नाहीत, असे म्हणत त्या महिलेने अकलूज पोलीस ठाण्यात जाऊन ठाणे अंमलदार हेंबाडे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर हेंबाडे यांनी फोन करून तांबोळी यांना पोलीस ठाण्यात बोलून घेऊन त्यांना शिवीगाळ केली होती. या घटनेमुळे तांबोळी यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील लोकांनी वेळीच त्यांना अकलूजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
या प्रकारानंतर ते शनिवारी सध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार होते. मात्र या गोष्टीची माहिती मिळताच हेंबाडे यांनी शनिवारी दुपारी तांबोळी यांच्या पानटपरीवर जाऊन तुझी पानपट्टी काढून टाकतो, असा दम दिला. त्यानंतर तांबोळी यांना हेंबाडेचा त्रास असह्य झाला आणि पोलीसच आपल्याला न्याय देण्याऐवजी अन्याय करू लागल्याने त्यांनी पुन्हा औषध घेतले. यानंतर मुलाने आणि पत्नीने त्यांना अकलूज येथील खासगी रूग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तांबोळींच्या आत्महत्येनंतर माळशिरस तालुका प्रहार अपंग संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी हेंमाडे यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे. तसेच त्यांनी हेंबाडेंचा मोबाईल चेक करावा आणि पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे, अशी मागणी केली आहे.