सोलापूर - शहरात स्मार्ट सिटीचे कामकाज युध्दपातळीवर सूरु आहे. शहरातील मुख्य चौकात व मुख्य रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. हे काम खासगी ठेकेदारांना देण्यात आले आहे. या कामात कंत्राटदारांनी शहरातील हातपंप निकामी केले आहेत. याचाच एक उदाहरण म्हणजे लक्ष्मी मंडई येथील हातपंप निकामी करण्यात आला आहे. युवा सेनेच्या नेत्यांनी या हातपंपाला सलाईन लावून स्मार्टसिटीच्या खासगी कंत्राटदाराचा निषेध केला आहे.
हातपंपाला लावले सलाईन -
दत्त चौक, पाणीवेस, लक्ष्मी मंडई येथील स्मार्ट सिटीच्या कामासाठी रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम करणारे स्मार्ट सिटीचे कंत्राटदार यांनी लक्ष्मी मंडई येथील सार्वजनिक वापरातील हातपंपामधून इलेक्ट्रीक मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसा केला. येथील काम संपल्यानंतर या खासगी कंत्राटदाराने इलेक्ट्रीक मोटार आणि हातपंपाचे इतर साहित्यदेखील घेऊन गेला. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हातपंप दुरुस्त करून देण्याची मागणी केली. तरीदेखील महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याविरोधात युवा सेनेच्या नेत्यांनी या हातपंपाला सलाईन लावत स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले.
स्मार्ट सिटीत पाणीच नाही -
स्मार्ट सिटी या गोंडस नावाखाली शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. जागोजागी रस्ते खोदले जात आहेत. रस्त्याच्या कामामुळे हातपंप, पाण्याच्या पाईपलाईन तोडल्या जात आहेत. खाजगी ठेकेदार मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीत पाण्याचा ठणठणाट निर्माण होत आहे.
हेही वाचा - अॅमेझॉननंतर 'डॉमिनोज'ही मराठीचा वापर करणार, मनसेची मागणी मान्य