सोलापूर - लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योगांना बसला आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींना देखील लॉकडाऊनचे चटके बसले आहेत. मात्र, लॉकडाऊननंतर हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. नियम व अटीप्रमाणे सलून दुकानांना मंजुरी देण्यात आली असून दुकानांत निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक केले आहे. सलून दुकानामधील निर्जंतुकीकरणाची किंमत ग्राहकांना मोजावी लागत आहे. त्यामुळे कटिंगचे भाव वाढले असून ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. दरम्यान, ही भाव वाढ तात्पुरत्या स्वरूपाची आहे, अशी माहिती दुकान संघटना अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी दिली. जिल्ह्यात सध्या कटिंगसाठी 100 रुपये तर स्टायलिश कटिंगला 130 रुपये, असे दर आकारले जात आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक झाले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी हात धुणे आणि मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचा अधिकचा खर्च वाढला आहे. अगोदर चार महिन्याचे लॉकडाऊन आणि त्यानंतर वेगवेगळे खर्चिक नियम यामुळे पैशांची बचत होणे, अवघड झाले आहे. कटिंग दुकानांमध्ये कात्री, वस्तरा, कंगवा, खुर्ची, टेबल या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही नियमावली ग्राहकांच्या फायद्याची आहे. मात्र, त्यामुळे दुकानदारांनी कटिंगचे दर वाढविले आहेत.
सध्या सलून किंवा कटिंग दुकानांमध्ये फक्त कटिंग आणि हेअर डायला परवानगी देण्यात आली आहे. दाढी, फेस मसाज, हेड मसाज याला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे फक्त कटिंग करणे दुकानदारांना परवडत नसल्याची माहिती अभयकुमार कांती यांनी दिली. साधी कटिंग 100 रुपये तर स्टायलिश कटिंग 130 रुपये या दराने केली जात आहे. कोरोना महामारीचा काळ संपेपर्यंत हे दर असणार आहेत. महामारीचा काळ संपल्यानंतर कटिंग 70 रुपये व दाढी 50 रुपये, असे नवीन दर ठरवले जाणार आहेत. यापूर्वी साधी कटिंग 60 रुपये व दाढी 40 रुपये असे दर होते. म्हणजे, 100 रुपयांत दाढी कटिंग करण्यात येत होती.
सरकारने पार्लर, सलूनधारकांनी कोणकोणती काळजी घ्यावी, कसे सामाजिक अंतर राखावे, ग्राहकांना कोणत्या सेवा द्याव्यात, याविषयी सूचना केल्या आहेत. प्रत्येक ग्राहकासाठी एकदा वापरून टाकून देता येईल असे स्वतंत्र रुमाल वापरणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला सेवा दिल्यानंतर खुर्चीचे निर्जंतुक करावे. तसेच दुकानाचेही निर्जंतुक करणेही बंधनकारक आहे. यामुळे दुकानदारांचा खर्च वाढला आहे. स्वाभाविकच त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला आहे.