सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्यावतीने गोपीचंद पडळकर यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. सत्कार समारंभात गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत एकेरी भाषेत उल्लेख करत जहरी टीका केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत इतका कळवळा होता, तर शरद पवार हे यंदाच्या वर्षी चौंडी येथे का आले नाही. शरद पवार चार वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, तसेच केंद्रात अनेक वर्षे सत्तेत होते. त्यावेळी चौंडीला यायचे सुचले नाही. चौंडी आठवली नाही, अशी टीका करत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. शरद पवारांच्या एकेरी उल्लेखाचा आता राष्ट्रवादीत भडका उडू शकतो.
जेजुरी संस्थांबाबत बोलताना पवारांवर टीकास्त्र : आमदार गोपीचंद पडळकर टीका करताना जेजुरी संस्थांबाबत बोलताना पवारांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे शरद पवार यांना गेल्या वर्षी चौंडी गाव ताब्यात घ्यायचे होते. मात्र, हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. यासाठीच धनगर समाजाच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौंडी सतत जागृत ठेवले पाहिजे. जेजुरी देवस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवला. जेजुरी संस्थानने हा पुतळा बसवला. हे संस्थान होळकरांचे आहे. पवारांचा या संस्थानाशी काहीही संबंध नाही. होळकरांनी या जेजुरी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, ही होळकरांची जहागिरी आहे असे पडळकर यांनी सांगितले.
रोहित पवारांची उडवली खिल्ली : गोपीचंद पडळकर म्हणाले, रोहित पवार हे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी प्रसाद वाटत होते. पण धनगरांच्या घरी वर्षाला पाच बोकड कापतात. त्यांच्या दावणीला किती कोंबड असतात, हे तुला माहिती नाही का माकडा? असे म्हणत पडळकर यांनी रोहित पवार यांचा माकड असा उल्लेख केला. धनगर समाज काय उपाशी आहे, तुम्ही प्रसाद वाटताय. धनगरांच्या घरी पाहुणे आले तरी कोंबड कापतात. तुम्ही आता आयुष्यभर प्रसाद वाटायच्या कामाला आहात, असा टोला पडळकरांनी रोहित पवारांना लगावला.
हेही वाचा :