सोलापूर - दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तीन संशयीत दरोडेखोरांना जेलरोड पोलिसांनी वेळीच बेड्या ठोकल्या. अन्यथा सोलापूरमधील सराफ दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास झाला असता. पोलिसांच्या सतर्कतेने ही मोठी हानी टळली. यामध्ये बसन्ना राजू शिंदे (रा. न्यू शिवाजी नगर, गोंधळे वस्ती, सोलापूर), आकाश उर्फ अंड्या मोहन वडतीले (रा. मराठा वस्ती, सोलापूर), सोहेल खुदाबक्ष मुलाणी (रा. चांद तारा मशीदजवळ, जुना विजापूर नाका, सोलापूर) अशी संशयीत आरोपींची नावे आहेत.
स्मशानभूमीत बसून दरोड्याचा प्लॅन करत होते
आकाश वडतिले, सोहेल मुलाणी आणि बसन्ना शिंदे हे तिघे सोलापूर शहरातील एका स्मशानभूमीत बसून दरोड्याचा प्लॅन करत होते. जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला याबाबत कुणकुण लागली. त्यांनी लगेच वरिष्ठांची परवानगी घेऊन स्मशानभूमीत सापळा लावला आणि मोठ्या शिताफीने तिघांना अटक केली.
दरोड्यामध्ये वापरण्यात येणारे सर्व साहित्य जप्त
जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आरोपींना अटक करतेवेळी त्यांच्याकडे दरोड्याचा साहित्य आढळून आला. यामध्ये लोखंडी तलवार, स्क्रू ड्रायव्हर, कटवणी, कापडी हँडग्लोज, कापडी मुखवटा, मिरची पूड, सुती दोरखंड, दोन मोबाईल, एक मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस कोठडीत गुन्हे उघडकीस
या तिन्ही संशयीत दरोडेखोरांना कोर्टात हजर केले असता त्यांना 8 डिसेंम्बर 2020पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कसून तपास केला असता त्यांनी आणखी गुन्हे उघडकीस आणले आहे. यामध्ये 1 डिसेंम्बर रोजी एका ट्रक चालकाला मारहाण करून लुटले होते. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांना या संशयीत दरोडेखोरांनी दिली. सोलापूर मार्केटयार्डामधून कांदा व लसणाचे पोतेदेखील यांनी चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण तीन गुन्हे याकडून उघडकीस आले आहेत.