सोलापूर - कोरोना रोखण्यासाठी सरकारने सर्व आस्थापना आणि खासगी कंपन्या, अन्य उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांचे 'वर्क फ्रॉम होम' च्या माध्यमातून रोजगार चालू ठेवलेले आहेत. त्यामुळे विडी कामगारांनाही 'वर्क फ्रॉम होम' द्या, अशी मागणी कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
'वर्क फ्रॉम होम द्या, अन्यथा...'
'विडी उद्योग हा ९५ टक्के घरगुती उद्योग आहे. म्हणजेच वर्क फ्रॉम होम. कामगारांना कच्चा माल घेणे आणि पक्का माल देणे यासाठी लागणारा कालावधी कांही मिनिटांचा आहे. तेही तीन दिवसाआड अशा पद्धतीने कारखानदारांचे नियोजन आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपायांची अंमलबजावणी करण्याची तयारीसुध्दा शासनापुढे दर्शविली आहे. तरीही विडी कामगार महिलांना काम न मिळाल्याने त्यांची उपासमार होत आहे. राज्य शासनाने या विषयी तातडीने निर्णय घेऊन विडी कामगारांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. अन्यथा १८ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर प्रातिनिधिक स्वरूपात धरणे आंदोलन करणार आहे', अशी घोषणा कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली आहे.
'विडी कामगार महिलांची उपासमार'
'महाराष्ट्र राज्यात ३ ते ३.५ लाख विडी कामगार आहेत. त्यापैकी सोलापूर शहरात ६५-७० हजार महिला विडी कामगार आहेत. हे सर्व कामगार व त्यांचे कुटुंबीय पूर्णपणे त्यांच्या उत्पन्नावरच अवलंबून आहे. राज्यात मिनी लॉकडाऊन/ब्रेक द चेनचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. महिला विडी कामगारांचे ९५ टक्के काम हे घरातूनच होते. इतर राज्यात विडी कामगारांना नियमित काम मिळते. मात्र महाराष्ट्र राज्यात विडी कामगार महिलांची उपासमार होत आहे. तेलंगाणा राज्यात या काळात दररोज कामासाठी ४ तासाची सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्र वगळता इतर सर्वच राज्यात विड्यांचे उत्पादन व विक्री चालू आहे. मात्र, सोलापुरातील महिला विडी कामगारांची उपासमार होत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना काम देणे आवश्यक आहे', असेही आडम यांनी म्हटले आहे.
'विडी कामगार महिलांना 5 हजार रुपये अर्थसहाय्य द्या'
'महिला विडी कामगार मोठ्या संख्येने हाल अपेष्टा सहन करत आहेत. या विडी कामगार महिलांना लॉकडाऊनमध्ये 'वर्क फ्रॉम होम' द्यावे. तसेच लॉकडाऊन काळासाठी 5 हजार रूपये राज्य शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात यावे. हा निर्णय न झाल्यास 18 मे 2021 रोजी विडी कामगारांचे प्रातिनिधिक स्वरूपात धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे', असे नरसय्या आडम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याबाबतचे लेखी निवेदन ईमेलद्वारे मुखमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, राज्य कामगार मंत्री, उद्योग मंत्री, पालकमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव कामगार व उद्योग विभाग, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सोलापूर पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सहायक कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक आदींना पाठविल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्येही डान्स बार सुरू, पालिकेचा बुलडोझर