सोलापूर - पार्वतीच्या बाळाची ऑनलाइन शाळा दमानी विद्या मंदिर शाळेने साकारली आहे. बाळ गणेश ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत असताना वेगवेगळ्या पद्धतीने घरात लॅपटॉप आणि मोबाईलवर शिक्षण घेत असतानाचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले आहे. कला शिक्षक मल्लिनाथ जमखंडी आणि मुख्याध्यापक निर्मला भोसले यांच्या पुढाकाराने ही रांगोळी साकारण्यात आली आहे. बाप्पा मारत आहेत ऑनलाइन गप्पा अशी टॅगलाईन या रांगोळीची आहे. विद्यार्थी आणि पालकांसाठी ही रांगोळी प्रदर्शनास उपलब्ध करण्यात आली आहे. लॅपटॉप झाला फळा, शिवजी म्हणतात लक्ष दे बाळा, गणेशाला ही लागला मोबाईलचा लळा अशा आशयावर या रांगोळीत बप्पा लॅपटॉप, मोबाईल या डिजिटल साहित्य सोबत रमलेला दिसत आहे.
सलग चार दिवस रांगोळीच्या माध्यमातून डिजिटल बाप्पा साकारले -

पृथ्वी गोल आहे. तसेच ग्रंथ याबरोबर असणारा बाल गणेश रांगोळीच्या माध्यमातून मनाला भूरळ पाडत आहे. सेल्फी घेणारा बाप्पा पाहिला की आपणही सेल्फीत आपोआप क्लिक होतो. अशा प्रकारच्या रांगोळ्या सोलापुरातील दमाणी विद्या मंदिर शाळेत साकारण्यात आल्या आहेत. या रांगोळ्या साकारण्यासाठी मल्लीनाथ जमखंडी ,शरण अळीमोरे, नितेश जमखंडी व प्रदीप सुतार यांना सलग चार दिवस लागले आहे.
ऑनलाइन शिक्षण घेताना रांगोळीच्या माध्यमातून बालगणेश प्रकटले -

सद्यस्थितीत सर्व विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत आहेत.दमाणी प्राथमिक विद्या मंदिर येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला आहे. विद्यार्थी व पालकांना बाल गणेश ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत आहे.ज्या प्रकारे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेताना स्वतःची सेल्फी घेत आहेत, तसेच झोपून लॅपटॉप हाताळतात त्याच प्रकारे ऑनलाइन शिक्षण घेताना बालगणेश रांगोळीच्या माध्यमातून साकारले आहे.
कोरोनामुळे सर्व शाळांतून ऑनलाइन शिक्षण -

कोरोना महामारीमुळे राज्यातील सर्व शाळांचे वर्ग ऑनलाइन झाले आहेत.ऑनलाइन शिक्षणाचा दुरुपयोग जितका झाला फायदा देखील तितकाच होत असल्याची माहिती शिक्षाकानीं दिली. कारण अनेक पालक आपल्या मुलांना मोबाईल किंवा लॅपटॉप देत नव्हते. पण ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थ्यांना संगणक किंवा लॅपटॉप,स्मार्ट फोन हाताळता येऊ लागले.ऑनलाइन शिक्षणाची पद्धत अनेक विद्यार्थ्यांना समजून आली.