सोलापूर - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी आयाराम गयारामांनी राजकारण तापवायला सुरुवात केलीच होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये गेलेल्या विखेंचे नातेवाईक जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. आचेगाव येथील जयहिंद साखर कारखान्याचे चेअरमन गणेश माने- देशमुख हे विखे पाटलांचे जावई आहेत, आणि ते आता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत
गणेश माने-देशमुख यांनी जयहिंद शुगरच्या माध्यमातून तालुक्यात दांडगा जनसंपर्क वाढवला आहे. सुजलाम सुफलाम असेलल्या पश्चिम महाराष्ट्रात स्वामी समर्थांची नगरी असलेले अक्कलकोट शहर आणि तालुका मात्र विकासापासून वंचित आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोट मतदारसंघाचे सध्या सिद्धराम म्हेत्रे हे नेतृत्व करत आहेत. मात्र, या निवडणुकीत भाजपला हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचा असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच दृष्टीने सासरे विखे पाटलांच्याकडून वरिष्ठ पातळीवर हालचाली करून तिकीट मिळविण्यासाठी माने देशमुखांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तर येथील भाजपचे तालुक्याध्यक्ष सचिन कल्यानशेट्टी हे देखील या मतदारसंघातून इच्छूक आहेत.
माने-देशमुख हे सोलापुरातील साखर सम्राटांच्या यादीतले एक सदस्य आहेत. राजकारणासाठी नव्हे जनतेच्या विकासासाठी मैदानात उतरतोय, असे सांगत जयहिंद साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जनसपर्क वाढवायाला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात त्यांनी चांगलाच जम बसविला आहे. गावभेटी, 'कारखाना शेतकऱ्यांच्या दारी' यासारख्या त्यांच्या जनसंपर्क मोहिमा यशस्वी होताना दिसत आहे. अक्कलकोट तालुक्यातील जनतेचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे. अक्कलकोटला उजनीचे पाणी आणणे, शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढणे, स्वामी समर्थांचे स्थान म्हणून अक्कलकोटचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे आणि ते एक विकासाचे रोल मॉडेल म्हणून नावारुपास आणण्यासाठी प्रयत्न करणे या सारख्या विकासाच्या मुद्द्यावर माने-देशमुख भर देताना दिसून येत आहेत.
तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच येत्या काळात स्वामी समर्थ सहकारी साखर कारखानाही चालवायला घेण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. या माध्यमातून तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच नागणसूरला लवकरच दुसरा साखर कारखाना सुरू करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
पक्षादेश आल्यास भाजप कार्यकर्त्यांना स्वीकारावे लागेल-
भाजपकडून गणेश माने-देशमुख यांच्यासह अनेकजण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. सचिन कल्ल्याणशेट्टी यांनी या मतदारसंघात सध्या विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका सुरू केला आहे. ते सध्या भाजपचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र, भाजपने ज्याप्रमाणे आता आघाडीतील उमेदावर पक्षात घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलेही आहे. त्यानुसार राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्या माने देशमुख किंवा काँग्रेसचे आमदार म्हेत्रे यांना भाजपने तिकीट दिल्यास येथील कार्यकर्त्यांना नाराज न होता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. मात्र, यापूर्वीच काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या भाजप प्रवेशाला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता.
अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचे वर्चस्व आहे. असे असले तरी आता तेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील गणिते बदलताना दिसणार आहेत. तसेच भाजपकडून तिकीट मिळविण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता प्रत्येक जण आपल्या कामाच्या जोरावर आणि गॉडफादरच्या माध्यमातून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. भाजप श्रेष्ठींनीही या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळेल या बाबत कोणताही सूचक इशारा अद्याप दर्शवला नाही. त्यामुळे येथील भाजप उमेदवाराबाबत इच्छूकांसोबतच मतदारांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे मंत्री विखे पाटील जावयासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावून तिकीट पदरात पाडणार का? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.