सोलापूर - महाआघाडी सरकारने आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत. काय चौकश्या करायच्या त्या कराव्यात, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला आहे. फडणवीस सरकारने केलेले घोटाळे बाहेर काढूत असा इशारा महाआघाडीतील नेत्यांनी दिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमासमोर उत्तर दिले आहे.
अकलूज येथे आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर फडणवीस सरकारवर विरोधकांकडून आरोप होत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी ,यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू, असे वक्तव्य केले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही. जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काहीही आरोप करायचे असतील तर करावे, आमच्या काळात कोणाचीही अडवणूक केली गेली नाही. कोणते प्रोजेक्ट अडवले नाहीत, कसलाही भ्रष्टाचार केला नाही. कोणाला काय चौकशी करायची असेल त्यांनी करावी असे आव्हान फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारला दिले. अकलूज मध्ये कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील ,रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.