सोलापूर- अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा फास आवळला असून, अवैध रित्या गुटखा विक्री करणाऱ्या चार टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत. एमआयडीसी व विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
चार पान टपऱ्यात सुरू होती गुटखा विक्री
शुक्रवारी 5 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून, अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या चार टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईने टपरी चालक व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पवार पान शॉप (इंचगिरी मठाजवळ, विजापूर रोड) जप्त साठा ११४३ रू, श्रीराम पान शॉप ( इंचगिरी मठाजवळ विजापूर रोड, सोलापूर) जप्त साठा ३८०० रू, फेमस पान शॉप( एम आय डी सी रोड) जप्त साठा ६०५० रू. व एस के पान शॉप (आदर्श नगर,सोलापूर) जप्त साठा ८९०० रू. या चार पान टपऱ्या अन्न व औषध प्रशासनाकडून सील करण्यात आल्या असून, या टपरी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मावा विक्रेत्यांकडे मात्र दुर्लक्ष
सोलापूर शहरात ओला मावा आणि सुका मावा सर्रास विक्री केला जात आहे. शहरातील विविध चौकात पान टपरीवर मावा विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे. मात्र प्रशासन मावा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.