सोलापूर (पंढरपूर) - राज्यातील मंदिरं खुली करावीत यासाठी सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले. विठ्ठल मंदिरात धुडगूस घालून प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आता पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल मंदिरातील व्दाराजवळ धुडगूस
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरासह राज्यातील मंदिरे सर्वसामान्य भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीने विठ्ठल मंदिर जवळील नामदेव पायरी येथे शंखनाद आंदोलन केले. आंदोलनादरम्यान संतांची पायरी म्हणून समजल्या जाणाऱ्या नामदेव पायरी येथे पक्षाचा झेंडा घेऊन विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या जवळपास दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
गुन्हा दाखल
विठ्ठल मंदिराजवळील नामदेव पायरी जवळ भाजपाकडून भजन कीर्तन करत आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसले नाही. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.