सोलापूर- सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याने शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जमीन शेती योग्य राहिली नाही. शेतातील मुरूम व दगड उपसा करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनी विरोधात काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी 12 च्या सुमारास कामती येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सोलापूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षापासून दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून सुरू आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम, माती व दगड विनापरवानगी उत्खनन केल्यामुळे शेतजमिनी कसण्यासाठी योग्य राहिल्या नसल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, या मागणीसाठी कॉंग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस व कामती पोलीस ठाण्याचे पोलीस आंदोलकांची समजूत घालत रस्ता खुला करण्यासाठी समजूत घालत होते.
हेही वाचा-पगारी द्या ओ.. साहेब..! आयुक्तांना आर्त हाक देत रुग्णवाहिका चालक गाड्यांसह महापालिकेत
मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तरटगाव, वाघोली, कामती खुर्द, कामती बुद्रूक, इंचगाव, बेगमपूरसह मंगळवेढा तालुक्यातील अन्य गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम, काळी माती आणि दगडांचे उत्खनन करण्यात आलेले आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी शासनाकडे भरलेली नाही. लाखो ब्रास मुरूम आणि काळ्या मातीचे उत्खनन केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कसण्या योग्य राहिलेल्या नाहीत. "शासनाची योजना आहे, तुमच्या शेतात शेततळे करून देतो, शेतातील मुरूम घेऊन त्या ठिकाणी काळी माती टाकून देतो' असे सांगून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी आंदोलनावेळी केला.
आज जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील कामती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कंपनीकडून गौण खनिज कायद्यांतर्गत पाचपट दंड वसूल करण्यात यावा. कंपनीची वाहने ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. कंपनीचे अधिकारी व व्यवस्थापनावर योग्य ती फौजदारी कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी आंदोलनात जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, आकाश राठोड, कामती खुर्दचे माजी सरपंच संजय पाटील, आरिफ पठाण, जावेद शेख, लक्ष्मण भालेराव यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.