सोलापूर - राज्यातील काही भागात महापूर आलेला आहे. तर दूसरीकडे पाण्यासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे, अशी भयावह, विदारक आणि परस्पर विरोधी परिस्थिती राज्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंढरपूर तालूक्यातील तिसंगी तलावात पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे.
तिसंगी, सोनके परिसरातील तलाव कोरडा पडला असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तिसंगी तलावात पाणी, सोडावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरूवात केली आहे.
नीरा उजवा कालव्यातून सोनके तिसंगी तलावात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. तिसंगी येथील इनलेट नाल्याजवळ या उपोषणला सुरूवात करण्यात आली असून तिसंगी तलावात पाणी सोडले नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
सध्या निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. हे सोडण्यात आलेले पाणी नियमित आर्वतानाचे पाणी नसून ओव्हरफ्लो झालेले पाणी आहे. हे पाणी तिसंगी तलावात येणे, अपेक्षित असताना हे पाणी सांगोला तालुक्याला सोडण्यात आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, अधिकारी हे उडवा-उडवीची उत्तर देत आहेत. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तिसंगी तलाव कोरडा राहिला, असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
त्यामुळे पाणी न सोडल्यास तिसंगी गावासह परिसरातील 10 गावांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार, असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. उपोषणासाठी तानाजी गोफणे, नवनाथ कोळेकर, पाडूरंग हाके, संतोष पाटील बसले आहेत. या चौघांसोबत मोठ्या प्रमाणावर शेतकरी देखील आंदोलन स्थळी बसले आहेत.