पंढरपूर - करमाळा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आठ एकर जमीन पंचवीस वर्षांनंतरही परत मिळत नसल्यामुळे विष प्रशान करून आत्महत्या केली. मुबारक महिबूब मुलानी (वय 70 रा. भुवरवाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नावे आहे. नातेवाईकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मुबारक मुलानी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
मुबारक मुलानी यांनी आत्महत्यापूर्वी चिठ्ठीत सांगितले आहे, अरकिले बंधूनी माझ्याकडून जबरदस्तीने भाडेकरारावर सह्या कर व तसे न केल्यास शेती न करून देण्याची धमकी दिली. आठ एकरमधील चार एकर तू कर आणि चार एकर आम्ही करतो, असे म्हणून चार ते पाच हजार रुपये प्रमाणे 59 हजार रुपये दिले. याबाबतीतील सर्व व्यवहार दत्तात्रेय अरकिले यांच्या हस्तलिखित आहे. माझ्या उताऱ्यावर बँकेचे लोन व बोरची नोंद आहे. मल्हार कृष्णा अरकिले, नारायण कृष्णा अरकिले, दत्तात्रेय कृष्णा अरकिले हे माझ्या मुत्यूला जबाबदार असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.
करमाळा पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुबारक मुलानी यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातून थेट करमाळा पोलीस ठाण्यासमोर नेऊन ठेवला व अरकिले बंधू विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांकडून आत्महत्येस प्रवृत्त करणे कलमानुसार मल्हार कृष्णा अरकिले, नारायण कृष्णा अरकिले, दत्तात्रेय कृष्णा अरकिले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार सुनील जाधव करत आहे.