सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयात पंढरपूर येथील एका शेतकऱ्याने शोले स्टाईल आंदोलन केले आहे. खासगी सावकरांनी गेल्या दोन वर्षांपासून मानसिक छळ केला आहे आणि एक लाखाच्या बदल्यात 12 लाख वसूल केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांने दिली आहे. न्याय मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्या शेतकऱ्याने घेतली आहे.
इब्राहिम याकूब मुलाणी (वय 35 वर्षे, रा. उमरे पागे, ता. पंढरपूर) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावातील दोन खासगी सावकारांकडून दोन वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या सावकाराने 1 लाख रुपयांच्या बदल्यात 12 लाख रुपयांचा तगादा लावला आहे. तसेच कर्ज देताना या सावकारांनी कोरे चेक आणि बॉण्डवर सह्या घेतल्या होत्या. इब्राहिम मुलाणी याने 1 लाखाच्या बदल्यात 1 लाख 43 हजार रुपये खासगी सावकाराला दिले आहे.
या सावकरांच्या विरोधात पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, उपनिबंधक कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहे. तरीही न्याय मिळत नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका इब्राहिम मुलाणी याने घेतली आहे.
मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) सकाळी इब्राहिम मुलाणी याने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कार्यालयाजवळ असलेल्या टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. या शोले स्टाईल आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला आहे.
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत विरोध केल्याने सरपंचाच्या मुलाचा तलवारीने खुनी हल्ला