सोलापूर - गेल्या मार्च महिन्यात सोलापूरसह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. मार्चपासून पुढील दीड महिना जिल्ह्यातील नागरिकांनी कडक लॉकडाऊनचा अनुभव घेतला. लॉकडाऊनच्या काळात काही नागरिकांनी कमाईचे नवे मार्ग शोधले, तर काही व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक वस्तूंचा साठा करत काळाबाजार केला. लॉकडाऊनमध्ये वीज चोरीचे प्रमाण देखील वाढले. लॉकडाऊन काळासह मागील एका वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून विविध मार्गांनी एकूण 12 लाख 19 हजार 95 युनिट वीज चोरी झाल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.
सोलापुरात महावितरणच्या पाचही डिव्हिजनमध्ये वीज चोरी
महावितरणकडून जिल्ह्यात एकूण 5 डिव्हीजनची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पंढरपूर, अकलूज, बार्शी असे विभाग आहेत. या पाचही डिव्हीजनमध्ये विविध मार्गाने वीजचोरी झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर ग्रामीण डिव्हीजनमध्ये सर्वाधिक वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. वीज चोरीचे 430 गुन्हे सोलापूर ग्रामीणमध्ये दाखल करण्यात आले आहेत. तर पंढरपूर मध्ये वीज चोरीचे 213 गुन्हे, अकलूज येथे 94, सोलापूर शहरात 77, बार्शी ग्रामीणमध्ये 183, तर बार्शी शहरात 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास 12 लाख 19 हजार 95 युनिटची वीज चोरी झाल्याचा दावा महावितरणच्या वतीने करण्यात आला आहे. या वीजेची किमंत 1 कोटी 29 लाख 28 हजार रुपये इतकी आहे. यामध्ये मीटरमध्ये फेरफार करणे, मीटर रिमोट कंट्रोलवर करणे, तारांवर आकडे टाकणे अशा विविध प्रकारांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पंढरपूर विभागातून सर्वाधिक दंडाची रक्कम वसूल
महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीच्या प्रकरणांचा शोध घेऊन, वीज चोरट्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पंढरपूर विभागातून सर्वाधिक 18 लाखांची वसुली करण्यात आली. अकलूज येथून 5 लाख 21 हजार रुपये, बार्शीमधून 11 लाख 73 हजार, सोलापूर शहरामधून 16 लाख 29 हजार, तर सोलापूर ग्रामीणमधून 8 लाख रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली.
अशाप्रकारे होते वीज चोरी
वीज चोरीचे विविध प्रकार आहेत. ग्रामीण भागात मुख्यतः आकडा टाकून वीज चोरी केली जाते. ग्रामीण भागातील अनेक नागरीक किंवा शेतकरी हे महावितरणच्या खुल्या तारांवर आकडे म्हणजेच हुक टाकून वीज चोरी करतात. हे अत्यंत धोकादायक आहे. यामध्ये शॉक लागून मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. तर काही भागात मीटरमध्ये छेडछाड केली जाते. उदा. मीटर मध्ये इलेक्ट्रॉनिक चिप बसवून त्याला रिमोट कंट्रोलवर केले जाते. ज्यामुळे रिमोटद्वारे त्याचे रिडींग बंद केले जाते. मीटर रिमोटवर करणे हे प्रकार शहरात अधिक होतात. मीटर बायपासद्वारे देखील वीज चोरी केली जाते. बायपासद्वारे चोरी करताना, मीटरमध्ये जी वायर आलेली असते त्यालामध्येच तोडून त्याला थेट घरातील विद्युत उपकरणाशी जोडले जाते. त्यामुळे मीटरमध्ये वीज वापर केल्याची नोंदच होत नाही. असे सर्व वीज चोरीचे प्रकार सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आढळून येतात.
विजेचा अवैध वापर देखील वीज चोरीच
विजेचा अवैध वापर करणे हा देखील वीज चोरीचा गुन्हा आहे. ज्यामध्ये ज्या कारणासाठी वीज कनेक्शन घेतले आहे, त्याच पद्धतीने वापर करणे होय. काही नागरिक आपल्या घरातून आजूबाजूला वीज पुरवठा करतात पण हे कायदेशीर वैध नसून अवैध आहे. काही दुकानदार घरगुती वापरासाठी वीजेचे कनेक्शन घेतात. आणि त्याचा वापर दुकानासाठी करतात. तसेच काही कारखानदार वीज दर कमी आहे म्हणून इंडस्ट्रीयल वीज कनेक्शन घेतात आणि घरगुती किंवा दुकानांत देखील विजेचा वापर करतात. हे कायदेशीर अवैध असल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी 'ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
विद्युत कायदा 2003 नुसार वीज चोरी अजामीनपात्र गुन्हा
विद्युत कायदा 2003 नुसार शासनाची वीज चोरी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्यातील कलम 126,135,138 या तरतुदी नुसार वीज चोरीचा गुन्हा दाखल होतो. आणि संबंधित व्यक्तीला कोर्टातुन जामीन मिळत नाही. तसेच न्यायालयात हा गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्षापर्यंत दंडासह शिक्षा होऊ शकते.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीचं नाव बदलून लॉकडाऊन ठेवावं - निलेश राणे