सोलापूर- पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच अचारसंहिता दरम्यान आंदोलने, सभा, कार्यक्रमांना परवानगी नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबरला रोजी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. 5 नोव्हेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसेच १२ नोव्हेंबरपर्यंत या दोन्ही मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 13 नोव्हेंबरला अर्ज भरणे, 17 नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे,
एक डिसेंबरला मतदान-
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार असल्याचेही शंभरकर यांनी सांगितले. 5 नोव्हेंबरपर्यंत मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. पदवीधर झालेल्या युवकांनी आणि शिक्षकांनी नाव नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी केले आहे.
मतदार वाढण्याची शक्यता-
सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत शिक्षक मतदारसंघासाठी 12 हजार 424 तर पदवीधरसाठी 49 हजार 253 मतदारांची नोंदणी झाली आहे. शिक्षक मतदान केंद्राची संख्या 71 असून पदवीधर मतदान केंद्रांची संख्या 109 असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. गुरुवारपर्यंत नाव नोंदणी असल्यामुळे आणखी मतदार संख्या वाढण्याची शक्यता असल्याचेही शंभरकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे, डीसीपी वैशाली कडूरकर, पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, यासह आदी अधिकारी उपस्थित होते