सोलापूर - ईडी चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्यानुसार चालते हे अनेकवेळा निष्पन्न झाले आहे. राज्य सरकार पाडण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सांगितले. ईडी किंवा सीबीआय हे महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेऊन कारवाई करतात. हे अतिशय दुर्दैवी आहे, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली. शनिवारी सोलापुरातील इतर पक्षातील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश कार्यक्रम होता. त्यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला.
शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीबाबत खुलासा -
शनिवारी सकाळी तब्बल एक तास राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दिल्लीत चर्चा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली, राजकीय गणित बदलणार का? अशा अनेक चर्चा राज्यभरात रंगल्या होत्या. त्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा करत माहिती दिली की, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सहकारी बँका आणि नागरी बँकाबाबत चर्चा झाली आहे, असा खुलासा करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.
गर्दीबाबत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सोलापुरात हरताळ -
कोरोना महामारी रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक अंतर राखा आणि गर्दी करू नका, असे आदेश पारित केले होते. पण सोलापुरात हेरिटेज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाला होता. पक्ष प्रवेश करण्यासाठी आलेल्या नेत्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणले होते. त्यामुळे या कार्यक्रमामुळे सोलापुरात कोरोना महामारीचा उद्रेक होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.