सोलापूर - भारत ही श्रेष्ठ भूमी असून या देशाला थोर महापुरुषांची आदर्श आणि वैचारिक परंपरा लाभली आहे. सध्या भारत जगासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. पण या देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील विषमता आणि जातिवाद नष्ट होण्याची अपेक्षा गुरु घासीदास केंद्रीय विश्वविद्यालय, छत्तीसगडचे कुलाधिपती व माजी आमदार प्रा. डॉ. अशोक मोडक यांनी व्यक्त केली. सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित व्याख्यानात डॉ. मोडक हे बोलत होते.
वर्तमानातील वैश्विक आव्हाने आणि भारतीय चिंतन' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विकास घुटे आणि डॉ. माया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांनी केले. मान्यवरांचा परिचय भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी करून दिला.
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना खुर्चीचा दगा, शिवसेनेचे नाव घेताच पडता-पडता वाचले'
डॉ. मोडक म्हणाले की, 1991 पासून भारतासह जगात फार मोठे बदल होत आहेत. संक्रमणाचा काळ सुरू झाला, त्यात बाजारपेठा फार विशाल झाल्या. श्रीमंत-श्रीमंत होत आहेत तर गरीब-गरीब होत आहेत. ही फार मोठी विषमता आहे. ही नष्ट होण्याची आवश्यकता आहे. 2011 ते 2020 या दशकाच्या कालखंडात भारतात ऐतिहासिक घटना घडल्या. भारतभूमीला महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरूषांची परंपरा लाभली आहे. मानव विकास अहवालामध्ये भारताचे चिंतन गौरवास्पद म्हटले आहे.
हेही वाचा -उपरा'कार लक्ष्मण माने १२ एप्रिलला करणार राष्ट्रवादीत प्रवेश
विकासाचा खरा अर्थ स्वातंत्र्याचा विस्तार असून याचा गरिबांना फायदा झाला तरच खरे स्वातंत्र्य होय. गरिबी, जातीयवाद, धर्मवाद नष्ट करणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. मोडक यांनी भारताची वाटचाल विकासाकडे सुरू असल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, अमेरिका कमी वस्तूंचे उत्पादन घेते पण मार्केटिंग अधिक करते. आज भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. भारत सक्षम राष्ट्र बनत आहे. जे भारतात होते ते इतर कुठेही होत नाही. भारत सर्वगुणसंपन्न राष्ट्र असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या व्याख्यानासाठी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, व्यवस्थापन सदस्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्यासह अधिकारी, तेजस्विनी कांबळे, डॉ. रुपेश पवार, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.