सोलापूर - वैशाख शु.तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थ कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते. या तिथीला परशुराम आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसा पासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. यंदाची अक्षय तृतीया साधेपणाने आणि घरात राहून साजरी करा. तसेच यंदाच्या अक्षय तृतीयेला जल आणि पादत्राणे दान करण्याचे आवाहन सोलापुरातील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
जल आणि पादत्राणे दान करा
सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे कडक लॉकडाऊन आहे. यंदाची अक्षय तृतीया साधेपणाने आणि घरात राहून साजरी करा, असे सोलापुरातील पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले आहेत. तसेच यंदाच्या अक्षय तृतीयेला जल आणि पादत्राणे दान करा. असेही मोहन दाते यांनी आवाहन केले आहे.
अक्षय तृतीयेला उपयुक्त वस्तूंचे दान करावे
अक्षय तृतीयेला उपयुक्त वस्तूंचे दान करावे. पितृश्राध्द करून ब्राह्मण भोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती केल्याने अनंत फळ मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पित्रांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णाने सांगितल्याचा उल्लेख मदनरत्न या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण, श्राद्ध केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो.
यंदाच्या अक्षय तृतीयेला उन्हापासून रक्षण करणाऱ्या वस्तू दान करा
यंदाच्या अक्षय तृतीयेला उन्हापासून रक्षण करणाऱ्या छत्री, जलकुंभ, पादत्राणे या वस्तू दान द्या, असे सोलापुरातील पंचांगकर्ते मोहन दाते यांनी आवाहन केले आहे. स्त्रियांना हा दिवस महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्यानिमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात. या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, होम, स्नान आदी कृत्यांचे फळ अनंत असते. यामुळेच या तिथीला अक्षय तृतीया म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस असल्याने या दिवशी वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदी वस्तू खरेदी करतात.
हेही वाचा - सलग दुसऱ्या वर्षी अक्षयतृतीयेला 'लॉकडाऊन'; सराफ व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे होणार नुकसान