सोलापूर - माढा शहरातील दत्ताजी शिंदे आणि संदीप शिंदे यांनी फटाक्यांची विक्री सोडून या वर्षी पुस्तकाचे भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू केली आहे. प्रदूषण मुक्त दिवाळी आणि विचारांची दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे बंधूनी हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
दिपावली म्हटलं की बालगोपाळासह सर्वांनाच फटाक्यांचे आकर्षण असतं. साहजिकच कपड्याच्या खरेदीनंतर पाऊल फटाके स्टॉल कडे वळतात. मात्र माढ्यातील मेन रोड चौकात असलेल्या फक्त सह्याद्री उद्योग समुहाने फटाके स्टॉल ऐवजी यंदा जवळपास एक हजार विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवले आहे. यंदा शिंदे बंधूनीं मोठ्या सवलतीच्या-अल्प दरात पुस्तकांचा स्टॉल उभा करुन त्यांनी प्रदूषणाची फटाके नव्हे तर विचारांचे फटाके फोडून दिवाळी साजरी करण्याचा संदेश समाजाला दिला आहे.
जोर -जोराच्या कर्णकर्कश फटांक्याच्या आवाजामुळे पक्षु-पक्ष्यांना त्रास तर होतोच, शिवाय प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी सह्याद्री उद्योग समुहाचे दत्ताजी शिंदे व संदीप शिंदे फटाक्यांचा स्टॉल उभा करत असायचे. मात्र यावर्षी पासून त्यांनी फटाक्यांचा स्टॉल बंद करुन यंदाच्या वर्षीपासून पुस्तकांचा स्टॉल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणासह बालगोपाळ व शहरवासीयांपुढे विचारांची दिवाळी साजरी करण्याचा संदेश यातून त्यांनी दिला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी, स्पर्धा परीक्षेची, प्रबोधनात्मक, वैचारिक धार्मिक, कादंबरी, ग्रंथ, ललित वाड्मय यासह सर्वच प्रकारची पुस्तके त्यांनी मांडण्यात आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या पुस्तकांच्या स्टॉलला शहरवासीय गर्दी करुन प्रतिसाद देत आहेत.
वाचन चळवळीला प्रोत्साहीत करण्यासाठी सर्वच प्रकारच्या पुस्तकाचा सवलतीच्या दरात हा उपक्रम यंदापासून सुरु केला असून दरवर्षी तो असाच सुरुच ठेवणार असल्याचे, सह्याद्री उद्योग समुहाचे अध्यक्ष दत्ताजी शिंदे यांनी बोलताना सांगितले.