सोलापूर - ओबीसी आरक्षण प्रकरणावरून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आला होता. पण पोलिसांनी वेळीच पुतळा ताब्यात घेऊन आंदोलकांना पिटाळून लावले होते. यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भाजप जिल्हा प्रमुख श्रीकांत देशमुख यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती आणि सोलापुरातुन गावाकडे जाऊ देणार नाही, असे आव्हानही त्यांनी केल्याचा आरोप श्रीकांत देशमुख यांनी केला आहे.
या विषयावरून सोलापूरमधील भाजप आक्रमक झाली असून भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी संभाजी चौक येथे येऊन शिवसेना नेत्यांना चॅलेंज केले आहे. तुमच्या घराजवळील चौकात आलो आहोत. काय करायचे आहे, या समोर अशी दमबाजी प्रसिद्धी माध्यमांमधून केली आहे.
15 सप्टेंबर रोजी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षणाविरोधात धरणे आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता. यावरून सोलापुरातील शिवसेना आक्रमक झाली आणि थेट भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना कॉल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी संताप व्यक्त करत एक प्रकारे दमबाजी करण्यात आली. याला प्रतिउत्तर देत भाजप जिल्हाध्यक्ष यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोबत घेत सोलापुरातील संभाजी महाराज चौक येथे येत चॅलेंज केले आहे. शिवसेना भाजपाच्या नेत्याला सोलापुरातून पूढे जाऊ देणार नाही, असे आव्हान केले होते. आम्ही देखील गप्प बसणार नाही, आम्ही शिवसेना नेत्यांच्या घराजवळ आलो आहोत, आमच्या नेत्याच्या सावलीत तर येऊन दाखवा, असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.
हे ही वाचा - Audio Clip Viral : आरोग्य सेवा भरतीत घोटाळा.. पदासाठी 15 लाखांपर्यंत बोली, ओबीसी नेत्याचा आरोप
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणजे आठ आमदर आणि दोन खासदारांचे अध्यक्ष -
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात असे एकूण भारतीय जनता पार्टीचे आठ आमदार आहेत आणि दोन खासदार आहेत. अशा आठ आमदर आणि दोन खासदार असलेल्या जिल्ह्यात भाजपाच्या जिल्हाध्यक्ष यांना सन्मानाने वागणूक मिळत नाही. त्यांना दमबाजी केली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. कुणाला काही दंगा करायचा असेल तर या समोर, असे खासदारांनी ओपन चॅलेंज केले.
भाजप ही शिवसेनेची पुढची आवृत्ती - श्रीकांत देशमुख
भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी फोन करून दमदाटी केल्याचा आरोप यावेळी केला. भाजप ही शिवसेनेची पुढची आवृत्ती आहे. जशास तसे उत्तर देण्यास आम्ही देखील खंबीर आहोत, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले.