सोलापूर - भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज सोलापूरमध्ये झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षानंतराने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
या नेत्यांनी केले पक्षांतर
धनंजय महाडिक
राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांचा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी पराभव केला. त्यांनतर ते भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
राणा जगजितसिंह पाटील
राणा जगजितसिंह पाटील हे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातेवाईक आहेत. त्यांनाही आज अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांच्या शिवसेनेच्या ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पराभव केला होता.
जयकुमार गोरे
माण तालुक्याचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही अखेर हाती कमळ घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही जयकुमार गोरेंनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहिर पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते भाजप प्रवेश करणार असल्याचे निश्चिच मानले जात होते. अखेर आज त्यांनी सोलापूरमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.