पंढरपूर - शहर व तालुक्यातील दोनपेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्यांना पंढरपूर विभागीय कार्यालयाकडून हद्दपारीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील चाळीस जणांना हद्दपारीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.
'हद्दपारीच्या प्रस्तावात वाळू माफियांचा समावेश'
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदी वाहत असल्याने, वाळूची मोठी तस्करी होत असते. वाळू माफियांवर महसूल व पोलीस प्रशासनाची कडक नजर असतानाही, वाळू माफियांकडून चोरट्या पद्धतीने वाळूची तस्करी केली जाते. त्यामुळे पंढरपूर विभागीय पोलीस कार्यालयाने अशा वाळू माफियांवर आता हद्दपारीचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे चोरट्या पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर वचक बसेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
'पंढरपूर शहर व तालुक्यातील 40 जणांवर हद्दपारीचे प्रस्ताव'
पंढरपूर शहर व तालुक्यातील सराईत गुन्हेगार आहेत. तसेच, ज्यांच्यावर पंढरपूर शहर व तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशांवर आता हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामध्ये दोनपेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यातील 40 जणांवर आता हद्दवाढीचा प्रस्ताव विभागीय पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.