पंढरपूर - राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत. पंढरपूर येथे वाढता कोरोना संसर्गने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आहे. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय कोरोनाबाधित महिलेची यश्वस्वी प्रसुती करण्यात आली. या महिलेची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.
महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह -
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर मतदारसंघांमध्ये कोरोना संसर्ग वाढला. त्यातच पंढरपुरातील कोरोना रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. तर कोणत्या रुग्णांना रेमडेसिवीर, तर काहींना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्याच पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील 21 वर्षीय महिलेस उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेजवळ सोनोग्राफी अथवा इतर तपासणीचे कोणतेही रिपोर्ट नसल्याने तीची कोरोना चाचणी व इतर तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ती महिला कोरोना बाधित आढळून आली. मात्र, तपासणीमध्ये माता व बालकास धोका निर्माण झाला होता. उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिराम यांनी घेतला.
प्रसुतीनंतर माता व बालक यांची प्रकृती उत्तम -
आज शनिवारी सकाळी 6.30 वाजता महिलेची नैसर्गिक प्रसुती झाली. या महिलेने बालकास जन्म दिला असून जन्माच्यावेळी त्याचे वजन 2 किलो 400 ग्रॅम भरले आहे. पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तीने एका नवजात बालकाला जन्म दिला. बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम आहे. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेला एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या महिलेची प्रसुती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी गजानन गुरव व उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती डॉ.गिराम यांनी दिली.
हेही वाचा - ...तर महाविकास आघाडी सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल - राजू शेट्टी