सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते भाजप-सेनेच्या वाटेवर असतानाच शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले आहेत. आपण आता फक्त जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मी सांगोला विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मागितली आहे. पक्षाने मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
अलीकडेच साळुंखे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने सेनेत जाण्याची शक्यता
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये ही जागा शेकापच्या वाट्याला देण्यात आलेली आहे. राज्याच्या स्थापनेपासून फक्त एकदाच या ठिकाणी शेकाप वगळून उमेदवार निवडून आला होता. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे सांगोल्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत देखील शेकपला ही जागा सुटणार असल्याची शक्यता असल्याने दिपक साळुंखे-पाटील यांना सांगोल्यातून सध्या तरी संधी नाही.
तर दुसरीकडे सांगोला विधानसभेची जागा ही युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून साळुंखे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.