बार्शी - वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनसह इंजेक्शनचा तुटवडा यामुळे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत होता. शासनाच्या नियमावलीबाबत तर्क-वितर्क मांडले जात असतानाच बुधवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला असल्याचे चित्र पहिल्या दिवशी तरी पाहायला मिळाले.
बार्शी शहरासह तालुक्यात लॉकडाऊन घोषित बार्शी तालुक्यात रुग्णसंख्या तर वाढत आहेच शिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने उभारलेली यंत्रणा देखील कमी पडत असल्याने तालुक्यात 10 दिवसाचे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला होता. बुधवारपासून नियमांच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. केवळ मेडिकल आणि भाजीपाला विक्रीला मुभा देण्यात आली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनीही आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. मुख्य बाजारपेठेसह गल्ली- बोळातही शुकशुकाट होता. मुख्य बाजारपेठेतील रस्ते निर्मनुष्य होते तर चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 30 एप्रिलपर्यंत शहरातील किराणा दुकान देखील बंद राहणार आहेत. शहरात 500 हुन रुग्ण उपचार घेत आहेत तर परजिल्ह्यातून अनेक रुग्ण हे उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे कडकडीत बंद शिवाय पर्याय नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी हा बंदचा निर्णय घेतला होता.
जिल्ह्यात सर्वात प्रथम कडक लॉकडाऊन बार्शीत-
तालुक्यातील परस्थिती लक्षात घेता निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी बैठक पार पडली. या दरम्यानच, बंदचा निर्णय घेण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने निर्णय घेऊन तालुका बंद ठेवणारा बार्शी हा पहिलाच तालुका आहे. आता या बंदचा कितपत फायदा होणार हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - दिवे पेटवले, ताट वाजवली, त्यावेळेसचे लॉकडाऊन योग्य होत का? नाना पटोले यांच्या भाजपला कानपिचक्या