सोलापूर - आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपुरात जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 17 ते 25 जुलै या दरम्यान पंढरपूरसह 9 गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आषाढी यात्रेचा कालावधी हा आषाढ शुद्ध 11 जुलै ते 24 जुलै 2021 असा आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै ते 28 जुलै या काळात मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. परंतु, मंदिरातील सर्व धार्मिक विधी व परंपरा साध्या पद्धतीने पार पाडले जातील. तसेच वारकऱ्यांना चंद्रभागा स्नानास 18 जुलै ते 25 जुलै दरम्यान बंदी घालण्यात आली आहे.
- संचारबंदी करण्यात आलेली गावे-
आषाढी वारीनिमित्ताने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंढरपूरसह नऊ गावात संचारबंदी करण्यात आली आहे. शनिवारी 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावात संचारबंदी आहे. भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोन, कोठाळी आदी भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
- प्रतिकात्मक स्वरूपात पायी सोहळा -
सर्व मानाच्या 10 पालख्या वाखरी येथे दशमी 19 जुलै रोजी पोहोचल्यानंतर मंदिर समिती व प्रशासन यांच्यावतीने त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. संतांच्या वाखरी या ठिकाणी भेटी झाल्यानंतर सर्व पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करतील. पायी वारी सोहळा प्रतिकात्मक स्वरूपामध्ये पूर्ण करण्यासाठी वाखरीपासून विसावा मंदिर इसबावी हे साधारण 3 किमी अंतर सर्व मानाच्या पालख्यांना पायी जाण्यासाठी पूर्व परवानगी देण्यात आली आहे. प्रति पालखी सोहळा 40 वारकऱ्यांसह प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
- मानाच्या दहा पालख्या -
श्री संत एकनाथ महाराज संस्थान(पैठण, जि औरंगाबाद), श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान(त्र्यंबकेश्वर जि नाशिक), चांगावटेश्वर देवस्थान(सासवड, जि पुणे), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान(सासवड जि पुणे), श्री संत मुक्ताबाई संस्थान (मुक्ताईनगर, जि जळगाव), श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान(कौडण्यपूर, जि अमरावती), श्री संत तुकाराम महाराज संस्थान(देहू, जि पूणे), श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी जि पुणे), श्री संत नामदेव महाराज संस्थान(पंढरपूर जि सोलापूर), श्री संत निळोबाराय संस्थान(पिंपळनेर, जि अहमदनगर).
- पालख्यांचा प्रवास आणि वारकरी संख्या-
यंदाच्या वर्षी देखील पालख्या बसमधून येतील. एका पालखीसोबत 2 बस व प्रत्येकी बसमध्ये 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. सदर 40 वारकऱ्यांची यादी संबंधित प्रत्येक संस्थानाने पोलीस प्रशासनाला द्यावी अशाही सूचना दिल्या आहेत. तसेच पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट दोन दिवस आधी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व मानाच्या पालख्या दशमीच्या दिवशी सोमवारी 19 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आगमन होऊन शनिवारी 24 जुलै रोजी पंढरपूरहुन प्रयाण करतील.
- शासकीय महापूजा-
आषाढ शुद्ध एकादशी मंगळवार 20 जुलै 2021 रोजी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाचे मानकरी यांच्या हस्ते पहाटे 2.20 ते 3.30 पर्यंत महापूजा होणार आहे.
- वारकऱ्यांना चंद्रभागा स्नानास बंदी-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वारकरी व भाविकांची चंद्रभागा नदीत स्नानासाठी गर्दी होऊ नये यासाठी परवानगी दिलेल्या वारकऱ्यांव्यतिरिक्त इतर भाविकांना रविवारी 18 जुलै ते रविवारी 25 जुलै पर्यंत चंद्रभागा स्नानास प्रतिबंध करण्यात आला आहे.