पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यातील खासगी कोविड हॉस्पिटलमधून देण्यात येणाऱ्या बिलाबाबत अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. यामुळे रुग्णालयांमध्ये आकारण्यात येणाऱ्या बिलांची पथकामार्फत दररोज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी तालुक्यात शहर व ग्रामीणमध्ये 14 खासगी रुग्णालयांना प्रशासनाने कोविड हॉस्पिटल चालविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या रुग्णालयातील बिलांबाबत तक्रारीचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा-'उद्धव ठाकरे यांचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे'
लेखापरिक्षणासाठी 6 पथकांची नेमणूक
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तालुक्यात 14 खासगी रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांचे राज्य सरकारच्या आदेशानुसार लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयामधील बिलांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून लेखापरिक्षणासाठी 6 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकामार्फत खाजगी रुग्णालयांच्या रेमडेसिवीर तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लेखापरिक्षण करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.
हेही वाचा-ख्रिश्चन धर्मगुरुंकडून नियमांचे उल्लंघन करत प्रार्थना; 100 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
बिलाबत प्रांत कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू
पंढरपूर शहरामधील गॅलक्सी, लाईफलाईन, श्री गणपती, जनकल्याण, ॲपेक्स , श्री विठ्ठल, पावले, वरदविनायक, मेडीसिटी, ऑक्सिजन पोलीस, पडळकर, विठ्ठल, डिव्हीपी, तसेच करकंब येथील जगताप हॉस्पिटल या 14 खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयांच्या बिलाबाबत साशंकता असेल त्यांनी बिल अदा करण्यापूर्वी प्रांत कार्यालय नियंत्रण कक्षाशी 8446525250 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे. तसेच बिलाबाबत लिखित स्वरुपात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनावरील उपचारासाठी राज्य सरकारने दरपत्रक निश्चित केले आहे. या दरपत्रकातील दराहून अधिक बिल रुग्णालयांना आकारता येत नाहीत. जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला होता.