पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींसाठी 331 मतदान केंद्रांवर शुक्रवारी मतदान घेण्यात आले आहे. मतमोजणी सोमवारी पंढरपूरमधील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणीसाठी 219 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली आहे.
कासेगांव आणि करकंब ग्रामपंचायतींची मतमोजणी शेवटी होणार
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी तालुक्यात 71 ग्रामपंचायतींसाठी 84.87 टक्के मतदान झाले असून, 89 हजार 756 पुरुष मतदार तर 76 हजार 956 स्त्री मतदार असे एकूण एक लाख 66 हजार 712 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतमोजणीसाठी 8 टेबलावर 9 फेऱ्यात गावनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीस 30 ते 40 मिनिट लागणाची शक्यता असून, कासेगांव आणि करकंब ग्रामपंचायत मोठी असल्याने मतमोजणी सर्वात शेवटी करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रत्यक्ष पाहणीत मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्ष देण्यात आल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली आहे.
पोलीस बंदोबस्तामध्ये मतमोजणी
मतमोजणी केंद्रावर नागरिकांची गर्दी हेण्याची शक्यता असल्याने, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उद्या मतमोजणीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत निहाय निकाल ध्वनीक्षेपकावरून जाहीर करण्यात येणार असून, ज्या ग्रामपंचायतीची मतमोजणी असेल अशाच प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार सांळुखे यांनी यावेळी सांगितले.