सोलापूर - राज्यात ज्याप्रमाणे कोरोनामुळे होणारे मृत्यू लपविण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचप्रमाणे सोलापुरात देखील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा लपविण्याचे काम महापालिका आयुक्तांनी केले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. ते आज सोलापूर दौऱ्यावर असताना बोलत होते. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीमध्ये देखील घोटाळा करण्यात आल्याचे सोमैया यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. नॉर्मल मृत्यू पेक्षा तीनपटीने अधिक कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. सोलापूर शहरात एप्रिल महिन्यात 1566 मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. या पैकी फक्त 404 मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचे आयुक्त सांगत आहेत. मात्र त्यांनी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा लपवला आहे, असा आरोप यावेळी सोमैया यांनी केला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीमध्ये घोटाळा - सोमैया
रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. महापालिकेने सुरुवातीला रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी 810 रुपयांनी केली. त्यानंतर 1350 रुपयांनी केली. या खरेदी प्रक्रियेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाची महापौरांनी चौकशी करावी, व भ्रष्टाचार उघडकीस आणावा अशी मागणी देखील यावेळी सोमैया यांनी केली. 15 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र सरकार या दरम्यान झालेल्या कोविड मृतांचा आकडा लपवत आहे. भाजपतर्फे दोन सीएंना घेऊन फॉरेन्सिक कोविड ऑडिट करणार असल्याची माहिती देखील यावेळी किरीट सोमैया यांनी दिली.
हेही वाचा - विधवा शिक्षिकेसोबतची मैत्री भोवली, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या