पंढरपूर - सांगोला तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. सांगोल्यातील सब जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 54 कैद्यांपैकी 28 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कैद्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे.
सांगोल्यातील व्यापारी व कामगारांची कोरोना तपासणी
सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या साडेचार हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत. तर सांगोला तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सांगोल्यातील सर्व व्यापारी व कामगारांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार सुमारे 289 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील सर्व अहवाल हे निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगोला सब जेलमधील 28 कैद्यांना कोरोनाची लागण
सांगोला जेलमध्ये कैद्यांची संख्या मोठी आहे. जेलमधील कैद्यांना कोरोनाची लक्षणे जाणू लागल्यामुळे त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. 54 कैद्यांपैकी 28 कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.