सोलापूर - स्वछ भारत मिशन अंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत घंटागाड्यांना अनन्यसाधारण महत्व आले आहेत. शहरातील प्रत्येक घर हा रोज सकाळी घंटा गाडीची वाट पाहत असतो. तसेच सोलापूरमध्येही झोननुसार प्रत्येक वॉर्डात किंवा प्रभागात घंटा गाडी फिरते. या घंटागाड्यांवर रोजंदरीवर जवळपास 500 कर्मचारी काम करत आहेत. पण, कोरोना काळात फ्रन्ट वॉरियर्स समजल्या जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतनच दिले गेले नसल्याने या कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे. आपल्या हक्काच्या वेतना विषयी काही चौकशी केली असता ठेकेदार काम सोडून जा, अशी धमकी देखील देत आहे. ठेकेदाराकडून एक प्रकारे कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे.
सोलापूर शहरात एकूण 8 झोन आहेत. या आठ झोनमध्ये 228 घंटागाड्या आहेत. प्रत्येक घंटागाडीवर एक चालक व एक मजूर असे दोन म्हणजेच एकूण घंटागाड्यांवर 456 कर्मचारी काम करत आहेत. या घंटागाड्यांमध्ये ओला कचरा व सुका कचरा, अशी विभागणी केली आहे. गल्लीबोळात नागरिकांच्या घरातील कचरा घेत हे कर्मचारी स्वच्छतेचे काम करत शहराबाहेर एका डेपोमध्ये सर्व कचरा जमा करतात. सोलापूर महानगरपालिकेने या घंटागाड्यांचा ठेका एका खासगी ठेकेदाराला दिले आहे. त्यांच्या पगाराचे प्रश्न सोलापूर महानगरपालिकेकडे नसून या खासगी ठेकेदाराकडे आहे. कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता हे फ्रन्ट वॉरिअर काम करत आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून या 456 कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. तीन महिन्याचे वेतन नसल्याने ह्या कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर मधील सोशल मीडियावर एक कॉल रिकॉर्डिंग व्हायरल होत आहे. एक घंटा गाडी कर्मचारी आपल्या ठेकेदाराला वेतना विषयी माहिती विचारत आहे. पण, तो ठेकेदार अर्वाच्य भाषेत बोलून पगार घ्या व काम सोडून जावा, अशी भाषा वापरत आहे. यामुळे घंटा गाडी कर्मचारी नोकरी जाईल या भीतीमुळे चिडीचूप झाले आहेत. एक प्रकारे घंटा गाडी कार्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न या ठेकेदारांकडून होत आहे. ठेकेदाराला घाबरून एकही घंटागाडी कर्मचारी समोर येऊन बोलत नाही.
गेल्या आठवड्यात सोलापूर परिवहन कर्मचाऱ्यांनी 10 महिन्याच्या वेतनासाठी अचानक संप पुकारला होता. महापालिका आयुक्त व पालकमंत्री यांनी मध्यस्थी करून दोन महिन्यांचे वेतन देऊ, अशी ग्वाही देत परिवहन सेवेला चालू केले. पण, आता या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा मुद्दा समोर आला आहे. कोरोनाकाळात स्वच्छता ही महत्वाची बाब आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांना तीन-तीन महिन्याचे वेतन दिलेच गेले नाही तर हे कर्मचारी अचानक काम बंद करतील, अशी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे.