सोलापूर - अक्कलकोट तालुक्यात सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन त्यांनी मोर्चा काढला. नव्या कृषी कायद्यातील तरतुदी जाचक असून त्याचा निषेध करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासाठी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन अक्कलकोट तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. या कायद्यातील अन्यायकारक तरतुदी मागे घेण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
बियाणांचे पैसे, मजूरांसाठी पैसे अडत्याकडून नेण्यात येत होते. मात्र आता अडत्याची भूमिका काढल्याने हे सर्व बंद होणार, असे म्हेत्रे म्हणाले. सरकार शेतकऱ्याला खरेदीसाठी पैसे देणार नाही. सावकाराकडून पैसे घेतल्यास मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जाते. अशा वेळी सावकाराकडून लूट होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सरकारने भांडवलाची पर्यायी व्यवस्था देण्याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.