सोलापूर - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भावप्र वाढत असून लसीकरण मोहिम जोरात सुरू आहे. पण, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला मुबलक प्रमाणात लसीचा पुरवठा करत नाही, असा आरोप करत केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
लसीचे राजकारण करत महाराष्ट्र राज्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ
महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कमी रुग्णसंख्या असलेल्या गुजरातसारख्या भाजपाशासित राज्यांना महाराष्ट्रापेक्षा मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. केंद्रातील मोदी सरकार लसीच्या वाटपातही राजकारण आणि दुजाभाव करुन महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा निशाणा मोदी सरकारवर साधला.
संकटात देखील महोत्सवासारखे राजकारण केले जात आहे
पंतप्रधान मोदीनी लसीकरण महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद आहेत. लसीकरण महोत्सव साजरा कसा होऊ शकतो. कोरोनासारख्या गंभीर संकटातही राजकारणासाठी संकटाला महोत्सव म्हणून साजरा करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने महाराष्ट्राला ताबडतोब लसीचा पुरवठा करावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - 'सोलापुरातील खासगी रुग्णालय लुटमारीचा धंदा करत असेल तर सोडणार नाही'