सोलापूर: रजिस्ट्रेशनच्या नावाखाली वधू वर मंडळाकडून लग्नाळू युवकांची फसवणूक केल्याची बाब उघड झाल्याने बार्शीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीसानी कथित वधू वर मंडळ चालक, महिलेसह एजंटला ताब्यात घेतले आहे. बार्शी शहरातील एका मंगल कार्यालयात सुशिक्षित युवकांचा वधू वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. बार्शी शहरात सदर वधू वर मंडळाकडून तिसरा मेळावा घेण्यात आला होता. मात्र दोन्हीही मेळाव्यात लग्नाळू युवकांना वधू दाखवण्यात आली नाही.
नवरदेवांच्या नातेवाईकांना संशय: तिसऱ्या मेळाव्यात हीच परिस्थिती होती. त्यामुळे भावी नवरदेवांच्या नातेवाईकांना संशय आला. बार्शीतील मेळाव्यात युवकांना वधू दाखवण्यात आली नाही. वधू दाखवली नसल्याने वर मंडळींनी संताप व्यक्त करत मेळावा चालकाला चांगलेच धाऱ्यावर धरले होते. लग्नाळू व त्यांच्या पालकांनी बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली तक्रार दिली आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लग्नाळू युवक, कुटुंबीय, नातेवाईक बार्शी पोलीस ठाण्यात पोहचले.
कथित वधू वर मंडळाचे बनावट रॅकेट: पोलीसांनी तपास केला असता लग्नाळू मुलांच्या आई-वडिलांकडून लग्नासाठी पैसे घेतल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे कथित वधू वर मंडळाचे बनावट रॅकेट उघड आल्याचे लक्षात आले. पोलीसांनी वधु वर मंडळ चालक, महिला, एजंट ताब्यात घेतले आहेत. लग्नाळू मुलांना व त्यांच्या पालकांना बार्शी होत असलेल्या वधू वर मेळाव्यात मुलगी दाखवली जाईल, तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिले जाईल, असे आश्वासन दिले जात होते. अनेक तरूणांचे लग्नाचे स्वप्न यामुळे तुटले आहे. शिवाय या घटनेमुळे लग्नाळू युवक तसेच त्यांचे कुटूंबीय यांना मनस्ताप झाला. तसेच आर्थिक फसवणुकीलाही सामोरे जावे लागत आहे.
केवळ आश्वासने दिली: यासाठी लग्नाळू युवक तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये व डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची बाबदेखील समोर आली आहे. पोलीसांनी चौकशी केल्यानंतर हे वधू-वर सुचक मंडळ हे नोंदणीकृत नाही, तसेच या मंडळाने आजपर्यंत एकही लग्न लावून दिलेले नाही. केवळ आश्वासने दिलेली असल्याचे यावेळी पोलीसांच्या वधू-वर मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यातून दिसून आले.